योजनेचे लाभार्थी
- निराधार/निराश्रित महिला (विधवा महिला, कुटूंबाने दुर्लक्षित केलेल्या सामाजिक व आर्थिक पाठबळाशिवाय राहणाऱ्या महिला, नैसर्गिक आपत्तीमध्ये बेघर झालेल्या महिला, कुटुंबाने आधार काढून घेतलेल्या निराधार महिला).
- कौटुंबिक हिंसाचारात बळी पडलेल्या बेघर महिला.
- अनैतिक व्यापारातून सुटका केलेल्या महिला व मुली.
- लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिला व मुली.
योजनेचे वर्णन
महिलांची सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी केंद्र शासनाकडून “मिशन शक्ती” हा एकात्मिक महिला सबलीकरण कार्यक्रम १५ व्या वित्त आयोगाच्या सन २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीमध्ये सुरु करण्यात आला आहे. मिशन शक्ती या योजनेंतर्गतर्गत “संबल” व “सामर्थ्य” या दोन उप-योजना राबविण्यात येत आहेत. यापैकी “सामर्थ्य उपयोजनेंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला आहे. या उप योजने अंतर्गत पूर्वीच्या “स्वाधार” व “उज्ज्वला ” या दोन केंद्र पुरस्कृत योजना प्रशासकीय कारणासाठी एकत्रित करुन “शक्ती सदन” योजना ही महिलांच्या सुरक्षिततेसाठी व सक्षमीकरणाकरिता राबविण्यात येत आहे. शासन निर्णय अधिक्रमित करुन केंद्र पुरस्कृत “स्वाधार” व “उज्ज्वला ” योजना केंद्र पुरस्कृत “मिशन शक्ती” या एकछत्री योजनेतील “शक्ती सदन” योजनेमध्ये विलीन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार आर्थिक वर्ष २०२२-२३ पासून राज्यामध्ये “शक्ती सदन” योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
योजनेची उद्दीष्टे
-
महिलांना त्यांच्या पूर्ण क्षमतेची जाणीव होईल असे वातावरण निर्माण करणे
-
ग्रामीण महिलांना कौशल्य विकास, रोजगार, डिजिटल साक्षरता, आरोग्य आणि पोषणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 'वन स्टॉप कन्व्हर्जन सपोर्ट सर्व्हिसेस' पुरविणे
-
महिलांची सुरक्षितता व सक्षमीकरण करणे
योजनेचे स्वरुप
संस्थेतील प्रवेशितांबरोबर त्यांच्या कोणत्याही वयोगटातील अविवाहित मुली आणि १२ वर्षापर्यंतच्या मुलांना सदनामध्ये राहण्याची परवानगी असेल. दिर्घकालीन निवासाच्या व्यवस्थेची आवश्यकता असलेल्या प्रवेशित महिलांना शक्ती सदनामध्ये जास्तीत जास्त ३ वर्षापर्यंत राहता येईल. प्रकरणपरत्वे पिडित महिलेस ३ वर्षाचा कालावधी संपल्यावर शक्ती सदनामध्ये राहण्याची परवानगी संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी देऊ शकतील. तथापि, ५५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना शक्ती सदनामध्ये जास्तीत जास्त ५ वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी राहता येईल. त्यानंतर त्यांना वृद्धाश्रम वा तत्सम संस्थांमध्ये हलविणे आवश्यक असेल.
निकष / कार्यप्रणाली
‘शक्ती सदन’ मध्ये निराधार, बेघर स्त्रियांना तात्पुरती सोय असून किमान तीन वर्षं त्या स्त्रीला येथे राहता येऊ शकेल.