योजनेची माहिती
बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 16 जिल्हयांची निवड करण्यात आली असून 2001, 2011 च्या जनगणनेनुसार तसेच नोव्हेंबर, 2016 च्या प्राप्त आकडेवारीनुसार दर हजारी पुरुष बालकांमागे मुलींचा जन्मदर कमी असलेल्या जिल्हयांमध्ये सदर योजना राबविण्यात येते. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, अहमदनगर,जळगांव, औरंगाबाद, जालना, बीड, बुलढाणा, वाशिम, सोलापूर, पुणे, लातूर, नाशिक, हिंगोली,
उस्मानाबाद व परभणी या जिल्हयांमध्ये राबविण्यात येत आहे.
सदर योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून ही योजना राबविण्यासाठी लागणारा निधी केंद्र शासनाकडून संबधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांचे खाती वितरीत करण्यात येतो.
या अभियानाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत खालीलप्रमाणे व्यूहरचना ठरविलेली आहे
- बालिकेच्या समान दर्जा व शैक्षणिक प्रोत्साहानाकरिता समाजात कायमस्वरुपी संप्रेषण निर्माण करणे
- समाजामध्ये घसरत चाललेल्या चाईल्ड सेक्स रेशो व मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी जागृती निर्माण करणे
- ज्या जिल्हयात मुलींचा जन्मदर कमी झालेला आहे अशा जिल्हा व शहरांवर अधिक लक्ष केंद्रित करुन एकात्मिक व कृतीशिल आराखडा तयार करणे
- जिल्हा,तालुका व निम्नस्तरावर विविध संस्था व सेवा देणारे विभाग यांचा
- समन्वय घडवून आणणे.
लाभार्थी
बालक
तपशील
या योजने अंतर्गत मुलींचा जन्मदर वाढविण्याचे दृष्टीने जन जागरण मोहिमे अंतर्गत अनेक कार्यक्रम राबविण्यात येतात. जसे की, गर्भवती मातांची नोंदणी, मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याबाबत जनजागृती , वाढदिवस साजरा करणे, आरोग्य शिबिरे आयोजित करणे, मुलगी वाचवा- मुलगी शिकवाबाबत मार्गदर्शन, गुड्डागुड्डी बोर्ड त्यावर मुला-मुलींची जन्म संख्या लिहून ते सार्वजनिक ठिकाणी लावणे, पथनाटये, विविध स्पर्धा जिल्हास्तरावर
घेणे इत्यादि. केंद्र शासनाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेमध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी गुड्डा- गुड्डी बोर्डचा वापर करण्यात आला. यामध्ये बस स्थानक, रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, जिल्हा तालुक्याची कार्यालये अशा गर्दीच्या ठिकाणी मुलगा व मुलीचे जन्माचे आकडे बोर्डवर दर्शविण्यात आले. लोकसहभागाच्या माध्यमातून हे बोर्ड तयार करण्यात आले आहेत.
राज्यातील बालक लिंग गणोत्तर वृद्धिंगत करण्याच्या प्रमुख उद्देशाने राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने केंद्र शासनाची बेटी बचाओ बेटी पढाओ योजना बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद, वाशिम, कोल्हापूर, उस्मानाबद सांगली आणि जालना या दहा जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित केला आहे.
बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनची अतिमहत्वाकांक्षी उद्दीष्टे पुढीलप्रमाणे आहेत :
- पूर्वग्रहदूषित दृष्टीकोनामुळे होणाऱ्या लिंग निवडीला प्रतिबंध करणे. (स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध करणे)
- मुलींच्या जिविताची आणि संरक्षणाची खातरजमा करणे
- मुलींच्या शिक्षणाची आणि सामाजिक सहभागाची खातरजमा करणे
दि.१५ जून २०१६ पासून हिंगोली,सोलापूर, पुणे , परभणी , नाशिक, लातूर या अतिरिक्त जिल्ह्यांचा समावेश सदर योजनेत करण्यात आला आहे.
- शासन निर्णय दि. ६ ऑगस्ट,२०१८ नुसार उर्वरित १९ जिल्ह्यात सदर योजना लागू करण्यात आली आहे.
- देशात महाराष्ट्र हे असे राज्य आहे की, त्यामधील जळगाव आणि उस्मानाबाद
जिल्ह्यांना प्रभावी समुदाय प्रतिबद्धता, प्रसुती पूर्व लिंग निदान परिक्षण पूर्वसंकल्पनेची अंमलबजावणी, तसेच मुलींना बाल शिक्षणात सक्षम बनविणे या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष पुरस्काराने माननीय मंत्री महिला व बाल विकास मंत्रालय (भारत सरकार) यांच्या हस्ते दि. २४ जानेवारी ,२०१७ रोजी राष्ट्रीय बालिका दिनी सन्मामानित करण्यात आले आहे.
कागदपत्र
Beti.pdf
कार्यप्रणाली
अभियान राबविणारी यंत्रणा :-
नियोजन, अंमलबजावणी आणि सनियंत्रण ( जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत) करिता जिल्हा कृतीदल कार्यरत असून त्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. यामध्ये इतर विभाग म्हणून आरोग्य व कुटुंब कल्याण, पंचायतराज, ग्राम विकास आणि पोलिस विभाग इत्यादि यंत्रणा आहेत.
या अभियानांतर्गत कार्यरत असणारे विभाग:-
आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, 2) महिला व बाल विकास, 3) सामाजिक न्याय विभाग, 4) शिक्षण विभाग, 5) पंचायतराज, 6) ग्राम विकास, 7) विधी व न्याय विभाग, 8) इंडियन मेडिकल असोसिएशन यांचा प्रतिनिधी, 9) स्वयंसेवी संस्था